महाविकास आघाडीत कलगीतुरा : विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून सेना-कॉंग्रेस आमनेसामने 

मुंबई – सत्तांतर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीत देखील धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Vidhan Parishad Opposition Leader) निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) यावर आक्षेप घेतला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळाला पाहिजे. दुर्दैवाने शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी जळगावात दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, संख्याबळ पाहता जवळपास सर्व समान असल्याने काँग्रेसलाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देणे आवश्यक असून याबाबत गुरुवारी (11 ऑगस्ट) तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून या याबाबत चर्चा होईल. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप असून आम्ही जर मित्र आहोत, आघाडी आहे तर एकामेकांशी बोललं पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.