काँग्रेसला लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडायची आहे; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

चंडीगड – पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपानंतर काँग्रेस पक्ष केवळ आपल्या प्रियजनांवरच नाही तर विरोधकांच्याही निशाण्यावर आहे. काँग्रेस दलितांच्या विरोधात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

पक्षाचे पंजाब प्रभारी राघव चड्डा म्हणाले की काँग्रेसने तिकीट वाटपाच्या वेळी दलित नेत्यांकडे दुर्लक्ष केले आणि ते दलितांचा वापर फक्त मते मिळवण्यासाठी करते. दलितांची मते घेण्यासाठी काँग्रेसने चरणजित सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले आहे तसेच काँग्रेसला पंजाबमधील लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडायची आहे. राघव चड्डा म्हणाले, काँग्रेसमध्ये दलित नेत्यांना स्थान नाही.

काँग्रेस हायकमांड केवळ परिवारवादाला प्रोत्साहन देते. पंजाबमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकिटे देण्यात आली. सुनील जाखड यांच्या मुलाला तिकीट मिळाले आहे. खासदार संतोष यांच्या पुतण्याला तिकीट देण्यात आले. माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकीट मिळाले आहे. मात्र चरणजीत सिंह चन्नी यांच्या भावाला दलित असल्यामुळे तिकीट मिळाले नाही. दरम्यान, याआधीही आम आदमी पक्षाकडून या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.