निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ठाकरे गटासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठरणार डोकेदुखी ?

Shivsena : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. (The Central Election Commission has decided to give the name Shiv Sena and the symbol Dhanushyaban to the Shinde group.) उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवसेना पक्ष शिंदे गटाला मिळाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतोद पदी भरत गोगावले यांची निवड केली आहे. तर ठाकरे गटाने सुनील प्रभू यांच्याकडे विधिमंडळातील प्रत्येक पद सोपवले आहे. यातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्याने त्यात कोणाचा व्हीप लागू होणार? प्रतोद गोगावले यांनी बजावलेल्या व्हीपला अधिकृत मान्यता असणार आहे का ? ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हीप न पाळल्यास अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर राहील का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेची गोची करणारा ठरणार आहे.
दरम्यान, राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. काल कामकाज सुरू होताच न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार असून येत्या मंगळवारी, 21 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.