समीर वानखेडेंविरोधातील बदनामीसत्र चीड आणणारं, अंजली दमानिया यांचा वानखेडेंना पाठिंबा

मुंबई – क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर काही जणांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री  नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणावरून सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य करत वानखेडे यांना पाठींबा दिला आहे.

अंजली दमानिया  म्हणाल्या, नवाब मलिक यांच्यासारख्या माणसांनी त्यांच्याविरोधात जे बदनामीसत्र चालवलं आहे ते एकदम चीड आणणारं आहे. वानखेडे यांचं काम हे सरळ आणि स्पष्ट असल्याचं ऐकलंय. मलिक यांच्याकडून वानखेडे यांची प्रतिमा आणि विश्वासर्हता कमी करण्यासाठी खटाटोप सुरु आहे. अशा वेळी समीर वानखेडे यांच्या बाजूनं सर्व सहकारी आणि अधिकाऱ्यांनी उभं राहायला हवं.

आज जर त्यांच्यासोबत कुणी उभं राहिलं नाही तर तुम्हीदेखील तुमचं कर्तव्य व्यवस्थित पाडू शकणार नाहीत. याच नवाब मलिक यांनी माझ्यावरदेखील दररोज खोटे आरोप केले होते. पण त्यातून काहीच सिद्ध झालं नाही. आता हेच नवाब मलिक स्वत:च्या जायवाच्या अटकेबद्दल वैयक्तिक स्कोर सेटल करत आहेत. या सगळ्या कटकारस्थानाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत वानखेडे आणि एनसीबीच्या पाठीशी उभं रहावं, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.