देशाची अर्थव्यवस्था 6 पूर्णांक 5 टक्क्यांनी वाढण्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा अंदाज, केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार

Economic Survey 2022-23- आर्थिक सर्वेक्षण 2022-23 मध्ये पुढील आर्थिक वर्षात 6 पूर्णांक 5 टक्के वास्तविक जी डी पी अर्थात सकल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात काल सर्वेक्षण सादर केले. या सर्वेक्षणानुसार चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 7 टक्के वाढ अपेक्षित असून भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिल असं या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.(The Economic Survey predicts the economy to grow by 6.5 percent, the Union Budget will be presented today).

भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून या वर्षी मार्चमध्ये देशाचे सकल देशांतर्गत उत्पन्न 3 पूर्णांक 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स राहण्याची शक्यता आहे. तर ग्राहक किमतींमध्ये वाढ खूपच कमी झाल्याची नोंद घेण्यात आली. या सर्वेक्षणानुसार वार्षिक महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली राहिला असून घाऊक किमती 5 टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढत आहेत.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत 2021-22 मधील याच कालावधीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये गेल्या सहा वर्षांत सरासरी वार्षिक वाढ 4 पूर्णांक 6 टक्के अशी नोंदवण्यात आली आहे. यामुळे देशाच्या सर्वांगीण वाढ, विकास आणि अन्न सुरक्षेसाठी कृषी आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळण्यास मदत झाली असल्याचं या आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.गेल्या काही वर्षांत देश कृषी उत्पादनांचा निर्यातदार म्हणून उदयास आला असून 2021-22 मध्ये ही निर्यात 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे.तर वित्तीय तूट 2022-2023 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 6 पूर्णांक 4 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

2023-24 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 6 पूर्णांक 5 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचं आणि ती 6 ते 6 पूर्णांक 8 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही. अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षात देशाची जी डी पी वाढ चांगली राहण्याची अपेक्षा असल्याचंही नागेश्वरन यांनी सांगत चालू दशकाच्या उर्वरित काळात भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.