पाचवी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यात 31 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान रंगणार

पुणे : दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250दर्जाची टेनिस स्पर्धा असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलात 31डिसेंबरपासुन प्रारंभ होत असून या स्पर्धेच्या पाचव्या सत्रासाठी जगातील 17व्या क्रमांकाच्या मरीन चिलीचसह अव्वल100 खेळाडूंमधील 16खेळाडूंनी  आपला सहभाग निश्चित केला आहे.

आयएमजीच्या मालकी असलेल्या व राईजच्या व्यवस्थापनाखाली टाटा ओपन महाराष्ट्र या स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने पुण्यात पाचव्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.

हि स्पर्धा गेली दोन वर्षे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडली होती. आता भारतीय मौसमातील ही पहिली स्पर्धा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात होत असल्याने या स्पर्धेत सहभागी होऊन प्रमूख खेळाडूंना ऑस्ट्रेलियन ओपन या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी तयारी करता येणार आहे. एमएसएलटीए यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून टाटा समूह यांचे प्रायोजकत्व व महाराष्ट्र राज्य सरकार यांचे सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे.

यावेळी बोलताना स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा आयोजित करणे ही केवळ आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. आगामी स्पर्धेची मालिका ही पुण्यातील टेनिसची पाच गौरवशाली वर्षे साजरी करणारी मालिका आहे. तसेच, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धा होत असल्यामुळे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील, यामुळे एक आयोजक म्हणून आमच्यासाठी हि खरच सुखावणारी बाब आहे. आम्ही या स्पर्धेसाठी येणारे सर्व खेळाडू आणि अधिकारी यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.

अमेरिकन ओपन स्पर्धा 2014मध्ये जिंकणाऱ्या चिलीचने ही स्पर्धा 2009 व 2010मध्ये जिंकली होती. 2018मध्ये त्याने उपांत्य फेरी गाठली होती. चिलीच बरोबरच मुख्य ड्रॉमध्ये अव्वल50 खेळाडूंमध्ये नेदरलँडचा बोटिक व्हॅन डी झांडशुल्प(मानांकन 35), इंग्लंडचा एमिल रुसुवोरी (मानांकन 40), अर्जेंटिनाचा सबस्तियन बाझ (मानांकन 43) , अमेरिकेचा जेम्सन ब्रुक्स बी (मानांकन 48), स्लोवाकियाचा एलेक्स मोलकान हे पाच प्रमूख खेळाडूही या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

या स्पर्धेचा कट ऑफ 115असून स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 31डिसेंबर पासुन सूरू होणार आहेत. स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मधील सामने 2 ते 7 जानेवारी दरम्यान रंगणार आहेत. झांडशुल्प याने या वर्षातील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धेत भाग घेतला होता. विंबल्डन मध्ये त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत तर फ्रेंच ओपन स्पर्धेत राफेल नदालकडून चौथ्या फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. म्युनिच एटीपी 250स्पर्धेत उपविजेतेपद मिळवुन त्याने मौसमातील सर्वोत्तम कामगिरी केली.

यावेळी स्पर्धेचे संयोजन सचिव प्रवीण दराडे, राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र, म्हणाले की, सर्वोतोपरी प्रयत्न करुन ही स्पर्धा यशस्वी केल्यामुळे आमच्या गुंतवणुक दारांसाठी सुद्धा आम्ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पुण्यात होणाऱ्या यंदाच्या स्पर्धेत अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होत असून हे सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक व तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी ही स्पर्धा व आमची व्यवस्था आनंददायक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

गतवर्षीच्या उपविजेता रुसु व्होरी याने वर्षभरात अव्वल 20 खेळाडूंमधील तीन खेळाडूंना पराभूत केले असून बाझने तीन एटीपी 250स्पर्धांमधील इस्तोरील येथील स्पर्धा जिंकून बस्टार्ड आणि सेंटीयागो येथे विजेतेपद मिळविले. डावखुऱ्या ब्रुक्स बी याने दलास व अटलांटा स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. पुण्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक असेल. डावखुऱ्या मोलकन यानेही लियोन व माराकेच स्पर्धेत अंतिम फेरी गाठली व त्यात अव्वल दहामधील फेलिक्स एलियासिमे याच्यावरील विजय लक्षणीय ठरला.