स्टिंग ऑपरेशननंतर आली विशेष सरकारी वकिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई –  महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला.

सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.

दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत आता प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल, असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत. फडणवीसांच्या आरोपांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया प्रवीण चव्हाण यांनी दिलीय.