जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढा – अजित पवार

मुंबई   – जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला तर सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. त्यामुळे आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली.

सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आमची जुन्या पेंशन योजनेसाठी बैठक झाली. यात तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने केला. परंतु जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवेवर झाला आहे. अत्यावश्यक सेवा बर्‍याच ठिकाणी बंद आहे. संघटनेसोबत चर्चा केली मात्र त्यातून मार्ग निघालेला नाहीय याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.

काम बंद आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत सरकारची काय भूमिका आहे याबाबत सरकारला निवेदन करण्यास सूचना करावी अशी मागणीही अजित पवार यांनी अध्यक्षांकडे केली.