सोलापूरच्या लक्ष्मीच्या हातच्या कडक भाकरी जगभरात पोहचल्या

परिस्थिति माणसाला लढायला शिकवते असे म्हणतात. पण पडत्या काळात स्वतातील गुणांची पारख करून त्यांचा योग्य वापर केला तर एक उत्तम व्यवसाय उभा राहू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मी बिराजदार होयं.

अवघे नववी शिक्षण झालेल्या लक्ष्मी यांच्यामध्ये प्रचंड जिद्द होती. लवकर लग्न, अपुरं शिक्षण, घरातील आर्थिक स्थिती हालाखीची यामुळे लक्ष्मी या मानसिक तणावात होत्या. संसार चालू ठेवण्यासाठी त्यांनी अनेक कामे केली पण म्हणावे तसे यश हाती लागत नव्हते.

आपण कडक भाकरी उत्तम बनवितो, जर कडक भाकरीचा व्यवसाय केला तर अशी कल्पना लक्ष्मी यांच्या डोक्यात आली. त्यांनी त्यांची ही कल्पना घरी आणि जवळच्या काही व्यक्तीसमोर मांडली. सर्वांनी त्यांना वेड्यात काढले. त्यांची चेष्टा केली पण त्यांनी ठोस निर्णय घेतला, व्यवसाय करायचा तर तो फक्त आणि फक्त कडक भाकरीचाच.

त्यांनी काही कडक भाकरी बनविल्या आणि सोलापुरातील एका प्रसिद्ध दुकानात गेल्या. दुकानदारास कडक भाकरी विक्रीस ठेवण्याची विंनती केली. पण तो दुकानदार म्हणाला , लोक येथे ताज्या भाकऱ्या खात नाहीत, तुमच्या या कडक भाकरी कोण खाणार?  लक्ष्मी यांनी दुकानदाराला विनंती केली, जर त्या विकल्या गेल्या नाहीत तर मी पुन्हा घेऊन जाईल.

दुकानदाराने त्या भाकरी ठेवून घेतल्या. संध्याकाळी त्या दुकानदाराने लक्ष्मी यांना फोन केला आणि सांगितले उद्यासाठी ज्वारीच्या दहा आणि बाजरीच्या दहा कडक भाकरीचे पॅकेट आणून द्या. लक्ष्मी यांचा उत्साह आणखी दुणावला आणि त्या आणखी पदर खोसून कामाला लागल्या.

लक्ष्मी यांच्या कडक भाकरी पाहता-पाहता संपूर्ण सोलापुरातच काय देशात प्रसिद्ध झाल्या. लक्ष्मी आणि त्यांची आणखी एक मैत्रीण दोघीनी मिळून सुरू केलेल्या या व्यवसायाने आता साता समुद्रापार झेप घेतली आहे.

अमेरिका, फ्रान्स , इटली, जपान या सारख्या अनेक देशात लक्ष्मी यांच्या भाकरी जातात. आज त्यांच्याकडे 20 हून अधिक महिला काम करतात. रोज पाच हजारांहून अधिक भाकऱ्या थापल्या जातात. भाकरी सोबत चटणी आणि काही उन्हाळी पदार्थ देखील विकले जातात.

लक्ष्मी यांचा मुलगा आणि मुलगी हे देखील त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करतात. 2012 साली संतोषी माता गृहउद्योग नावाने व्यवसाय सुरू केला. सोलापूर आणि कर्नाटक राज्यांच्या काही भागात अगदी पूर्वी पासून कडक भाकऱ्या  बनविल्या जातात. या भाकऱ्या  एक महिन्यांहून अधिक काळ टिकतात. दही आणि शेंगदाणा किंवा जवस चटणी या सोबत त्या आवडीने खाल्ल्या जातात.

घरगुती आणि पारंपरिक असलेल्या कडक भाकरीला लक्ष्मी यांनी ग्लोबल केले आहे, त्यामुळे लक्ष्मी बिराजदार हे नाव अमेरिकेत देखील गाजत आहे. लक्ष्मी यांनी अफाट कष्ट करण्याची तयारी आणि स्वतावरील विश्वास या जोरावर त्यांनी लाखोंचा व्यवसाय उभा केला आहे. स्वताचा व्यवसाय करू पाहणाऱ्या सर्वानसाठी लक्ष्मी या आदर्श आहेत.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM&t=1s

You May Also Like