भारतीय गोलंदाजांनी इतिहास घडवला;अवघ्या 62 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव गुंडाळला 

 मुंबई – भारताला 325 धावांत रोखल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था खूपच वाईट झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 62 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव गुंडाळला आहे. न्यूझीलंडकडून काईल जेमिनसनने सर्वाधिक 17 धावांचं योगदान दिलं. सलामीवीर टॉम लॅथमला 10 धावा जोडता आल्या.

या दोघांपैकी कोणत्याही किवी फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडचे 3 फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. दरम्यान, भारताकडून रवीचंद्नन अश्विनने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 8 धावा देत 4 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अक्षर पटेलला 2 आणि जयंत यादवला एक विकेट मिळवता आली.

न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम झाला. भारताने न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या गोलंदाजीला जशास तसे उत्तर देत या सामन्यावर आपली पकड मजबूत केलीय. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 263 रनची आघाडी घेतली. त्यानंतरही न्यूझीलंडवर फॉलो ऑन न लादण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला आहे .

सर्वात कमी धावसंख्या करण्याच्या न्यूझीलंडच्या या ‘लाजिरवाण्या’ विक्रमाच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर ऑकलंड येथील इंग्लडचा सामना आहे. १९५५ मध्ये ऑकलंड येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ केवळ २६ धावा करून बाद झाला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावरची धावसंख्या ४२ आहे. १९४६ मध्ये वेलिंग्टन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळता न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४२ धावांमध्ये बाद झाला होता.

दरम्यान, तत्पूर्वी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये १० बळी घेत अनिल कुंबळेची बरोबरी करत इतिहास रचला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात एजाजने ही कामगिरी केली.