‘मनसेच्या नेत्याचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं तुम्ही विजयी…,’ रवींद्र धंगेकरांचे लक्षवेधी विधान

Pune: आज सकाळीपासूनच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

कसब्यात पहिल्या फेरीपासूनच रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. सोळाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांनी ६९५७ मतांची आघाडी घेतली आहे. विजयाच्या मार्गावर असताना धंगेकरांनी लक्षवेधी विधान केले आहे. मी बरोबरीत राहायला बघत होतो, मला आघाडी मिळतेय. मनसेच्या एका नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही विजयी झाले आहात. कारण त्यांनीच काम केलंय, असे विधान रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.