विधानसभेत सीमाप्रश्नाचा ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र एकिकरण समितीने मानले अजित पवार यांचे आभार

नागपूर – बेळगाव, कारवार, धारवाड, खानापूर, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातील ८६५ मराठी गावे महाराष्ट्रात सामील करुन घेण्याचा, तसेच सीमाभागातील मराठी गावांच्या संघर्षाला संपूर्ण पाठिंबा देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर केल्याबद्दल आणि हा ठराव सभागृहात मांडण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

समितीचे खजिनदार प्रकाशराव मरगाळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दूरध्वनी करुन हे आभार मानले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सीमाभागातील मराठी माणसांच्या पाठीशी महाराष्ट्र एकजूटीने आणि भक्कमपणे उभा आहे. सीमाभागातील सर्व मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईपर्यंत हा लढा संपूर्ण शक्तीनिशी लढण्यात येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.