खातं कोणतं यापेक्षा खात्याला न्याय कसा देता हे महत्त्वाचं; मुख्यमंत्र्यांची सारवासारव

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. खाते वाटपानंतर यामध्ये बंडखोर गटाची अवस्था सांगता येत नाही अन् बोलताही येत नाही, अशीच झाली असली, तरी भाजपमध्ये (BJP) दिग्गजांना महत्त्वाच्या खात्यांपासून वंचित ठेवल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

दरम्यान, खाते वाटपानंतर शिंदे सरकारमधील अनेक मंत्री नाराज आहेत. महत्त्वाची आणि अपेक्षित खाती न मिळाल्याने या मंत्र्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली असून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेवटी खातं कोणतं आहे यापेक्षा या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्त्वाचं आहे. ज्या ज्या विभागाची जबाबदारी ज्या ज्या मंत्र्यांवर दिलीय ते नक्कीच ती जबाबदारी यशस्वी पार पाडतील. या महाराष्ट्रातील (maharashtra) जनतेला न्याय देतील. एकदा मंत्री झाल्यानंतर तो एका विशिष्ट भागाचा मंत्री (minister) नसतो तर संपूर्ण राज्याचा मंत्री असतो. त्यामुळे राज्यभर आमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून विकास केला जाईल. सामान्य लोकांना न्याय दिला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.