सावधान : कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गजन्य नवा व्हेरिएंट आला समोर

नवी दिल्ली- दक्षिणआफ्रिका आणि इतर दोन देशांमध्ये कोरोना विषाणूचा बी 1 पॉइंट 1529 हा नवा प्रकार आढळला असल्यानं केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना आणि हाँगकाँग या देशांमध्ये आढळलेला हा विषाणूचा हा प्रकार आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोटस्वानानंतर आता करोनाचा B.1.1529 हा व्हेरिएंट इस्राईलपर्यंत पोहचला आहे. इस्राईलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरलेला अधिक धोकादायक करोना व्हेरिएंट इस्राईलमध्ये सापडला आहे. इस्राईलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण मलावीमधून परतला होता.

इस्राईलमध्ये मलावीशिवाय इतर देशांमधून परतलेल्या अन्य २ प्रवाशांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या तीन देशांहून येणाऱ्या प्रवाशांची नीट चाचणी आणि तपासणी घेण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, युरोपात कोविड परिस्थिती बिकट होत असल्यान, राज्यात पुरेशी काळजी घेण्याची गरज असून, लसीकरण पूर्ण करण्याबाबत काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ज्या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग कमी आहे; तो वाढवणे आणि कोविड चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यावर यावेळी भर देण्यात आला. कोविडचा धोका पूर्णपणे संपलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वांनी कसोशीनं प्रयत्न केले पाहिजेत ,यावरही मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली.