मुंबई – मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याची सध्या बरीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. ममता यांचा हा दौरा आता काहीसा वादग्रस्त देखील बनू लागला आहे.कारण ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई भाजपा नेत्यांनी ममता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. एकतर त्या राष्ट्रगीत बसून म्हणाल्या इतकंच नाही तर राष्ट्रगीत अर्धवट म्हणत उठल्या. या अवमानासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, परंतु देशाभिमानापेक्षा त्यांना राजकारण मोठे वाटले अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांची याच मुद्द्यावर केलेली पोस्ट सध्या चांगल्याच चर्चेचा विषय बनली आहे. चौधरी आपल्या [पोस्टमध्ये म्हणतात, ममता बॅनर्जींनी बसून आणि अर्धवट राष्ट्रगीत म्हणलं अशा बऱ्याच पोस्ट कालपासून पाहिल्या. राष्ट्रगीत वाजवताना किंवा गातांना (whenever the national anthem is played or sung) काही नियम आहेत. पण हे नियम राष्ट्रगीताच्या ओळी गद्यात सांगत असतांना (while quoting) लागू होत नाहीत. दोन्ही ओळी त्यांनी बसूनच quote केल्या असत्या तरी त्यात कोणताही नियमभंग नाही.
सगळे लोक राष्ट्रगीत म्हणत असतांना एखादा माणूस नुसताच उभा असेल, राष्ट्रगीत म्हणत नसेल तर तो ही नियमाप्रमाणे गुन्हा नाही. फक्त त्यानं इतरांना राष्ट्रगीत म्हणतांना व्यत्यय आणणं हा गुन्हा आहे. राष्ट्रगीत म्हणजे भारताच्या विविधरंगी लोकरूपी फुलांना एकत्र गुंफणारा नाजूक धागा आहे, नागरीकांच्या गुलामगिरीसाठी पायात बांधलेला साखळदंड नाही.