मुक्ताताईंच्या दशक्रिया विधीपूर्वीच पोटनिवडणुकीची चर्चा, लाज वाटूद्या; राष्ट्रवादीतून रुपाली पाटलांना घरचा आहेर

Pune- भाजपच्या दिवंगत नेत्या आणि पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. अशातच ‘राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे नुकतेच कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले आहे. त्यामुळे पुण्यातील कसबा मतदारसंघाची जागा रिकामी आहे. अशात या जागेवर पोटनिवडणुक होऊ शकते. याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली पाटील (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, ‘मुक्ता टिळक यांचं आजारांनं निधन झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कसबा पोटनिवडणुक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार आहे. मुक्ताताई २०१९ विधानसभा निवडणुकीत आमदार झाल्यापासून आजारी होत्या. मुक्ता टिळक या आजारी असताना त्यांनी शक्य तेवढं काम केलं’.

‘अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत. कोणाचं दुःखद निधन झाल्यानंतर भावनिक म्हणून विचार होऊ शकतो. भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक लावल्या आहेत, पंढरपूर, मुंबईमध्ये पोटनिवडणुक झाल्या. कसबा मतदारसंघात असंही कामे झाली नाहीत. खासदारही आजारी आहेत. मुक्ताताई यांच्या घरात तसेही कोणी निवडणूक लढवणार नाही. त्यात मुळात २०१९ साली मनसेने माझं तिकीट मुक्ता टिळक यांच्यासाठीच कापलं होतं’, असा खुलासा रुपाली पाटील यांनी केला.

प्रशांत जगताप यांचा रुपाली पाटलांना घरचा आहेर
रुपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर कसबा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार?, पोटनिवडणुकीत उमेदवार देणार का? याकडे लक्ष लागले असताना रुपाली पाटील यांना घरचा आहेर मिळाला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीबद्दल कुठलीही चर्चा सहन केली जाणार नाही, असा इशारा देत पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रूपाली पाटील यांना झापलं आहे. ज्यांचा दशक्रिया विधी अजून झाला नाही आणि त्याच्या पदाबाबत अशी चर्चा करणे म्हणजे एक पुणेकर म्हणून लाज वाटते, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या प्रशांत जगतापांनी (Prashant Jagtap) मांडली आहे.

‘काही दिवसांपूर्वीच मुक्ताताई टिळक यांचे निधन झालं. त्यांचं जाणं म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक धक्का आहे. त्यांचा दशक्रिया विधी व्हायला अजून चार-पाच दिवस आहेत असं असताना सुद्धा राजकीय पक्ष आतील लोक कसबा विधानसभा मधील निवडणूक यासंदर्भात चर्चा करतात. मी माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सूचना देतोय की अशा प्रकारची चर्चा इथून पुढे सहन केली जाणार नाही.’

‘माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की ही पुण्याची संस्कृती नाही. ज्यांचा अजून दशक्रिया विधी झाला नाही पण तत्पूर्वी अशा चर्चा होणे म्हणजे एक पुणेकर म्हणून लाज वाटण्यासारखा आहे,’ असंही ते म्हणाले आहेत.