शिंदेंच्या ठाण्यातील घरापासून हाकेच्या अंतरावर अनेक डान्सबार सुरु असल्याचे उघड झाले – पवार

मुंबई – महाराष्ट्रासारख्या प्रगत… पुरोगामी राज्याच्या प्रत्येक शहरात… गावात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था… अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेली गुन्हेगारी… राज्यात सापडत असलेले अंमली पदार्थांचे साठे… युवकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता… महिलांवरील वाढते अत्याचार.. मुंबईसह राज्यातील शहरांना निर्माण झालेला दहशतवादी हल्ल्यांचा धोका… कोकणच्या सागरी किनारपट्टीवरील सुरक्षेचा प्रश्न… राज्य पोलिसांच्या आरोग्याचे, घरांचे प्रश्न, पोलिसांवरील वाढत असलेले हल्ले… पोलिसांच्या वाढत्या आत्महत्या अशा अनेक गोष्टींवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकाशझोत टाकत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये, विरोधी पक्षांनी मांडलेल्या, अंतिम आठवडा प्रस्तावावर अजित पवार यांनी सरकारच्या जोरदार टीका करत चांगल्या गोष्टींवर भाष्य केले. मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरात, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची झालेली दुर्दशा, रस्त्यांवरील खड्यांमुळे वाढलेले अपघात, खड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांचे जात असलेले बळी, खड्यांमुळे वाढलेले मणक्याचे आजार, अपघातामुळे येत असलेले अपंगत्व यासारख्या गंभीर प्रश्नांकडेही सरकारचे लक्ष वेधण्याचा, या प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रयत्न केला.

महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात, तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्राने कोरोनाविरुद्ध (Corona) यशस्वी लढा दिला. जगाने, आणि न्यायालयानेही त्या कोविडविरोधी लढ्याचे कौतुक केले. कोविडविरोधी लढ्यात सहभागी झालेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, लोकप्रतिनिधी, शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या प्रतिनिधींचे अजित पवार यांनी या ठरावाच्या निमित्ताने अभिनंदन करत आभार मानले.