‘पंतप्रधानांनी आतातरी डोळे उघडावे आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना जलदगतीने मायदेशी सुखरुप आणावे’

मुंबई –  रशिया-युक्रेन युद्धात काल भारतीय विद्यार्थी नवीन शेखराप्पा या २१ वर्षाच्या तरुणाचा मुत्यू झाला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतातील जवळपास २० हजार लोक युक्रेनमध्ये अडकले असताना प्रचारात व्यस्त असलेल्या पंतप्रधानांना या सर्वांना मायदेशी आणणे प्राधान्याचे वाटले नाही. अजूनही मोदी सरकार कासव गतीने काम करत असून वेळीच हालचाली करून युक्रेनमधून सर्वांना मायदेशी आणले असते तर नवीनचा मत्यू टळला असता, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नवीनच्या मृत्यूसंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, युक्रेन रशिया युद्धात तेथे अडकलेले हजारो विद्यार्थी भारताच्या मदतीची वाट पहात आहेत. युद्धाचे सावट दिसताच काँग्रेस पक्षासह अनेकांनी या विद्यार्थ्यांना तातडीने मायदेशी आणण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणुका ह्याच महत्वाच्या असून निवडणुकीच्या प्रचारात ते व्यस्त राहिले. आज युद्धाचा आगडोंब उसळला आहे, भारतीय विद्यार्थी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत परंतु भारताचे ऑपरेशन गंगा हे उशिरा सुरु केले त्यातही त्याचा वेग अत्यंत संथ असून हजारो विद्यार्थी जीव मुठीत घेवून बसले आहेत. भारताची कोणतीच मदत मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. या विद्यार्थ्यांना मरणाच्या दारात ठेवून प्रचारजीवी पंतप्रधान प्रचारात व्यस्त आहेत हे गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारापेक्षा देशहिताला प्राधान्य द्यावे, असे पटोले म्हणाले.

युद्धाची तीव्रता वाढली असून अजून शेकड़ो विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांवर काही ठिकाणी हल्ले करण्यात आले असल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या आहेत. अन्नपाण्याशिवाय हे विद्यार्थी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. पंतप्रधानांनी आतातरी डोळे उघडावे आणि अडकलेल्या विद्यार्थ्यांना  जलदगतीने मायदेशी सुखरुप आणावे, असेही पटोले म्हणाले.