म्हापश्यात खरी लढत डिसुझा-कांदोळकर यांच्यातच

म्हापसा : गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे धुरंधर नेते ठिकठिकाणी प्रचार बैठकांमधून मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या 14 तारखेला गोव्यामध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तारुढ भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांनी या निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला आहे.

दरम्यान, सध्या बार्देशमधील म्हापसा मतदारसंघ हा सध्या बऱ्याच चर्चेत आहे. २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जोशुआ हे काँग्रेसच्या सुधीर कांदोळकरांचा पराभव करून विजयी झाले. यंदा बहुरंगी लढत होत असली तरीही यावेळी सुद्धा कांदोळकर व जोशुआ मध्येच मुख्य लढत होणार आहे.

भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री मायकल लोबो हे सध्या म्हापशामध्ये सक्रिय झाल्याचे दिसत असून ते कांदोळकरांसाठी मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत म्हापसा पालिकेतील काही नगरसेवकही फिरताना दिसत आहेत. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे हा राहिला नसून तो लोबोंच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.

कांदोळकर यांच्यासाठी लोबो यांना ताकत लावावी लागत आहे तर भाजपकडून जोशुआ यांच्यासाठी भाजपने दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक दिग्गज नेते या मतदार संघात जोशुआ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मतदारसंघावर लक्ष केंदित केले असल्याने ही नवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे.

आपचे निमंत्रक राहुल म्हांबरे रिंगणात उतरले असून ते देखील चांगली मते घेतली असे सांगितले जात आहे. तृणमूलतर्फे तारक आरोलकर हे रिंगणात उतरले असून ते कांदोळकर यांची डोकेदुखी वाढवत आहेत. शिवसेनेतर्फे राज्य प्रमुख जितेश कामत हे रिंगणात असून त्यांचा विशेष प्रभाव पडेल, असे दिसत नाही. दरम्यान, बहुरंगी लढत होत असल्याचा फायदा जोशुआ यांनाच होऊ शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे. तरीही या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारेल हे ठामपणे कुणीही सांगू शकत नसल्याचे चित्र आहे.