रिपब्लिकन पक्षाला राज्य सरकार मध्ये मंत्रिपद मिळणार; फडणवीसांचे आठवलेंना आश्वासन

मुंबई  –  महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले (National President of the Republican Party Ramdas Athawale) यांनी सागर  बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.नवे सरकार  अडीज वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. त्यानंतर ची 5 वर्षेही भाजप महायुतीचे सरकारलाच मिळतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल.असा विश्वास व्यक्त करत रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या भाजप शिवसेना महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा द्यावा या मागणीबाबत ना.रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी  रिपब्लिकन पक्षाला नक्की  सत्तेत वाटा देऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांना दिले.

राज्य सरकार आता छोटे मंत्रिमंडळ करीत असून त्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला नक्की मंत्रिपद देण्यात येईल.तसेच महामंडळ आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला वाटा  देण्यात येईल  असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी आज माध्यमांना दिली आहे.