मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून रस्ता एकदम गुळगुळीत होणार; ग्रामीण भागातील रस्त्यांचे काय ?

मुंबई – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मंत्रीमंडळ सदस्यांसमवेत संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारपणामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार की नाही, यावर बरीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अधिवेशनात हजेरी लावणार सत्तधारी सांगत  आहेत. सरकारनामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी वर्षा बंगल्यापासून विधान भवनाकडे वळणाऱ्या रस्त्यांची डागडुजी हाती घेण्यात आली आहे. मानेची शस्त्रक्रिया झाल्याने प्रवासात मुख्यमंत्री ठाकरे त्रास होऊ नये, म्हणून ही व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांच्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते आहे. प्रवास करताना रस्त्यावरील स्पीड ब्रेकर, खड्डे यांचा त्यांना त्रास होणार नाही, यासाठी रस्त्याची डागडुजी सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यांची दुरुस्ती केली जात असेल तर मग राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो त्यामुळे हे रस्ते कधी व्यवस्थित होणार असं आता नागरिक विचारू लागले आहेत.