आई-वडिलांना फसवते याची खंत, पण…..

मुंबई : प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की स्वीटी, ड्रीम गर्ल आणि छलांग अशा सिनेमातनं अभिनय केलेली नुसरत भरुचा सध्या बॉलीवूडमधला ‘सेलेबल फेस’ म्हणून ओळखली जाते. आगामी ‘छोरी’ या हॉरर सिनेमातनं नुसरत आता दिसणार आहे. अॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा येत्या 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. विशाल फुरिआ दिग्दर्शित या सिनेमात नुसरत एका गर्भवती महिलेची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील तिच्या भूमिकेविषयी बोलताना नुसरत म्हणाली, “मी या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दिवसभर प्रेग्नंट बॉडीसूट घालून असायचे. केवळ बाथरूमला जाताना आणि झोपताना मी तो काढायचे. भूमिकेत समरस होण्यासाठी मी शूटच्या 25 दिवस आधीपासूनच हा प्रेग्नंट बॉडीसूट घालून भूमिकेचा सराव करीत होते.”

मुलाखती दरम्यान नुसरत भरुचाला तिच्या लग्नाविषयी विचारले तेव्हा ती म्हणाली, “माझे आईवडील जेव्हा लग्नाचा विषय काढतात तेव्हा मी तो टाळते. गेली अनेक वर्ष या मुद्दयावरून मी माझ्या आईवडीलांना फसवत आलेय. माझं अभिनयक्षेत्रातील करिअर जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा एखाद दुसरा सिनेमा केल्यावर माझ्या आई-वडीलांना मी लग्न करून संसार थाटावा असं सारखं वाटत होतं. कारण माझ्या समाजात प्रत्येकजण अगदी तरुण वयात लग्न करतात. अगदी लहान वय असतं ते. पण मी अद्याप लग्न केलेलं नाही यावरुन मला सारखं विचारलं जातं. अर्थात आईवडीलांना वाईट वाटू नये म्हणून मी माझ्यासाठी आणलेल्या स्थळांना भेटते. पण अद्याप मिस्टर परफेक्ट भेटला नाही ज्याच्याशी लग्न करण्यासाठी मी ‘हो’ म्हणावं.”

“मी बोहरी मुस्लिम समाजातील आहे. आमच्या समाजात मुलींचं खुप तरुण वयात लग्न केलं जातं. मला अजुनही कळत नाही इतक्या लवकर का लग्न करतात. पण हेच सत्य आहे, संस्कृती आहे. केवळ मुलीच नाहीत तर मुलांचं लग्नही खुप तरुण वयात केलं जातं. म्हणून माझ्या मागेही लग्नाचा तगादा गेल्या अनेक वर्षांपासून लावला जातोय. त्यामुळे प्रत्येक नवीन सिनेमा जेव्हा मी करीत असते तेव्हा माझ्या आईवडीलांना मी सांगते फक्त हा एकच सिनेमा करते, मग मी लग्न करीन. आणि हे असंच सुरू आहे. मी आईवडीलांनी दाखविलेल्या स्थळांना भेटते आणि सांगते की, यावेळेला मुलगा पसंत आला की मी नक्की लग्न करेन, पण अजून तरी असं काही झालेलं नाही. आता बघू माझा मिस्टर राईट कधी भेटतोय ते.”