शेत जमीन विकू न देणाऱ्या बापाचा मुलानेच नातेवाईकांच्या मदतीने काढला काटा; आरोपींना अटक

जालना- तालुक्यातील पुणेगाव येथे राहणाऱ्या 60 वर्षीय भाऊसाहेब चव्हाण या शेतकऱ्याचा त्याच्याच मुलाने शेतात काटा  काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  नेहमीप्रमाणे भाऊसाहेब चव्हाण हे शेतामध्ये झोपलेले असताना त्यांचा मोठा मुलगा अरविंद भाऊसाहेब चव्हाण याने आपल्या साथीदारांसह वडिलांचा काटा केवळ जमीन विकू देत नाहीत या कारणास्तव मुलाने हे दुष्कृत्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतामध्ये भाऊसाहेब चव्हाण हे नेहमीप्रमाणे संध्याकाळचे वेळी झोपण्यासाठी गेले होते. भाऊसाहेब चव्हाण यांच्या नावावर असलेली शेत जमीन अरविंद चव्हाण याला विक्री करून पैसे हवे होते, तसेच काही दिवसांपूर्वी विक्री केलेल्या बैलजोडीचे पैसे देखील भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडे होते ,परंतु भाऊसाहेब चव्हाण हे शेतही विक्री करू देत नव्हते आणि बैल जोडी विकून आलेला पैसा ही देत नव्हते.

या दोन्ही गोष्टीचा राग मनात धरून त्यांचा मोठा मुलगा अरविंद भाऊसाहेब चव्हाण याने वडिलांचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार दिनांक 3 जानेवारी च्या रात्री अरविंद चव्हाण याने त्याचे सहकारी आणि नातेवाईक अनिल अर्जुन अंभोरे, वय 22. सतीश अर्जुन अंभोरे, वय 25, यांच्या मदतीने हे काम केले. दिनांक 23 च्या रात्री हे तिघेही गाव झोपल्यानंतर भाऊसाहेब चव्हाण यांच्या शेताकडे गेले. सतीश अंभोरे हा रस्त्यावर थांबून पहारा देत होता, तर अनिल अंभोरे आणि अरविंद चव्हाण या दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने आणि काठ्यांनी भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर वार करून त्यांना जागीच ठार केले .

याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेने पूर्ण करून मयताच्या मुलासह अन्य दोघांना अटक केली आहे. मुलानेही खून केल्याची कबुली दिली आहे. खून केल्यानंतर मयत भाऊसाहेब चव्हाण यांच्या नावावर असलेली शेती विकून येणाऱ्या पैशातून अनिल आणि सतीश या दोघांना एक लाख रुपये देणार असल्याचे आमिष अरविंद आंभोरे याने या दोघांना दिले होते.

हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तगे ,सॅम्युअल कांबळे ,सुधीर वाघमारे, सचिन चौधरी, आदिंनी मिळून केला.