महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य सरकार पुढे ढकलण्याच्या तयारीत

मुंबई-  मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपणार असून निवडणूक होईपर्यंतच्या काळात नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार का, या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक होऊन पहिली महासभा होईपर्यंतच्या काळात प्रशासक नेमला जाईल. यासाठी मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा केली जाईल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यात बदल करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे आणि उर्वरित इतर महानगरपालिकांमध्ये हाच निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे.

सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहणार आहे.

महानगरपालिकांची निवडणूक ही महाविकास आघाडी साठी महत्त्वाची असणार आहे. मात्र ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि प्रभाग रचनेचा मुद्दा हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच कोरोनाच्या निमित्ताने या दहाही महत्त्वाच्या महानगरपालिका पुढे ढकलण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.