मुंबई | आर्थिक प्रगतीमुळे २०३० पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची (Maharashtra Energy conversion)गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ३.३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी गुरुवारी मुंबईत केले.
आशियाई विकास बँक (एडीबी) तर्फे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचे सौर ऊर्जीकरण (Maharashtra Energy conversion) या विषयावर आयोजित एक दिवसाच्या चर्चासत्राचे उद्घाटन करताना मा. आभा शुक्ला बोलत होत्या. यावेळी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि एडीबीच्या ऊर्जा संचालक डॉ. सुजाता गुप्ता उपस्थित होते.
आभा शुक्ला म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलिअन डॉलर्सची करण्यासाठी आगामी पाच वर्षात राज्याचा आर्थिक विकास झपाट्याने होईल व त्यासोबतच राज्याची विजेची गरज मोठ्या प्रमाणात वाढेल. भविष्यातील आव्हाने ध्यानात घेऊन राज्याची सध्याची ४२ हजार मेगावॅटची क्षमता २०३० साली ८१ हजार मेगावॅटवर नेण्यासाठीचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याची ऊर्जा क्षमता वाढविताना नवीकरणीय ऊर्जेवर भर दिल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होण्यासोबतच किफायतशीर दरात वीज उपलब्ध झाल्यामुळे विजेचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होईल.
त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर चालवून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे आगामी काळात राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेची भर पडेल. याखेरीज सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांमधून एकूण ३६ हजार मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता राज्यात वाढेल. वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ऊर्वरित वीज पारंपरिक स्त्रोतांमधून मिळविण्यात येईल. राज्याच्या ऊर्जा परिवर्तन आराखड्यात निर्मिती, पारेषण आणि वितरण अशा तिन्ही बाबींचा बारकाईने अभ्यास करून आराखडा तयार करण्यात आला आहे व त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
लोकेश चंद्र म्हणाले की, शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी अंमलात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही एक गेम चेंजर योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत २०२६ साली राज्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर चालविण्यात येतील. कृषी क्षेत्रासाठी शंभर टक्के सौर ऊर्जेचा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल.
मा. सुजाता गुप्ता यांनी सांगितले की, राज्यामध्ये कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जीकरणाचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे कृषी क्षेत्राला मदत होण्यासोबतच ऊर्जा क्षेत्राची आर्थिक स्थिती सुधारेल. विशेषतः विजेचे दर कमी करण्यास मदत होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही एक कल्पक योजना असून ती राबविताना आव्हानांचा प्रभावी मुकाबला करण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एडीबी महावितरणला सहकार्य करत आहे. -मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण