विरोधकांची ताकत वाढणार; लालू यादव आणि नितीश कुमार सोनिया गांधी यांना भेटणार

पाटणा – 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव 25 सप्टेंबर रोजी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात. या दिवशी चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त हरियाणातील फतेहाबाद येथे नितीश कुमार रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये विरोधकांची एकजूट दाखवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. या रॅलीनंतर नितीश कुमार त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यावेळी त्यांच्यासोबत आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादवही असतील.

बुधवारी पाटणा येथे झालेल्या RJD राज्य परिषदेच्या बैठकीत लालू प्रसाद यादव यांनी 2024 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेवरून हाकलून लावणार असल्याचेही सांगितले होते. ते म्हणाले होते,  मी नितीश कुमार यांच्यासोबत दिल्लीला जाईन आणि लवकरच सोनिया गांधींना भेटेन आणि त्यांच्या यात्रेवरून (भारत जोडो यात्रा) परतल्यानंतर राहुल गांधींनाही भेटेन.

एनडीए सोडून महाआघाडीसोबत सरकार स्थापन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करत आहेत. या क्रमाने त्यांनी अलीकडेच दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट राजकीय मैदानावर मजबूत होणार नाही, असे नितीश कुमार यांनी अनेकदा सांगितले आहे.