उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशला जाण्यासाठी टीचर्स स्पेशल ट्रेन एलटीटी कुर्ला येथून सुटणार

मुंबई – कोविड काळ सुरु झाल्यापासून रेल्वेने सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व स्पेशल ट्रेन रद्द केल्या आहेत. याही वर्षी जवळजवळ सर्व स्पेशल ट्रेन रद्द आहेत. परंतु त्यामुळे उत्तर प्रदेशला जाणा-या शिक्षकांची मोठी गैरसोय झाली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद टीचर्स स्पेशल ट्रेन सुरु व्हावी यासाठी प्रयत्नशील होती. दि. 30 मार्च 2022 रोजी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानुसार त्यानुसार एक शिक्षक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवनाथ दराडे यांनी केले आहे.

यासंदर्भात ना.ॲड.आशिष  शेलार यांनी दि. 20 एप्रिल 2022 रोजी रेल्वे मंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता.  शेलार यांनी यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालून शिक्षकांची होणारी गैरसोय रेल्वे मंत्रालयाला अवगत केली. रेल्वे बोर्ड सदस्य कैलास वर्मा , भाजपा नेते  संजय उपाध्याय,  आर. यू. सिंह,  जय पांडे व अमरजीत मिश्रा यांनी रेल्वे अधिका-यांशी व्यक्तिगत संपर्क साधून टीचर्स स्पेशल ट्रेन करिता प्रयत्न केले. रेल्वे मंत्र्यांचे खाजगी सचिव यांनी या विषयात व्यक्तिगत लक्ष घातले.

गाडी नंबर 01053 या टीचर्स स्पेशल ट्रेनचे आरक्षण उद्या दि. 29 एप्रिल 2022 रोजी दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष सुरु होणार आहे. ही शिक्षक विशेष गाडी कुर्ला ते बनारस अशी असून 2 मे 2022 रोजी कुर्ला एल.टी.टी स्थानकावरुन सुटणार आहे. या संदर्भातला संपूर्ण तपशिल रेल्वे पुढील एक- दोन दिवसात जाहीर करणार आहे. आरक्षणाचे नियम पुर्वीप्रमाणे आहेत. असे रेल्वेकडून सांगितले आहे. त्यामुळे शिक्षकांनी उद्यापासून आपल्या आरक्षणासाठी संबंधीत वेळेत उपस्थित राहून आपले आरक्षण नक्की करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उल्हास वडोदकर,  आनंद शर्मा,  प्रकाश मिश्रा,  रविंद्रनाथ सिंह,  निर्दोशकुमार दुबे, सावित्री यादव,  ममता शर्मा यांनी केले आहे.