परस्पर शेती विक्री केल्याच्या वादातून पत्नी अन मुलाने पित्याला संपविले

हिंगोली-  मन हेलावून टाकणारी घटना बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील बेलमंडल येथे घडली आहे. सुनियोजन पध्दतीने पत्नीने व दोन मुलांनी आपल्या वडिलाचा खून केला अन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात नेऊन जाळला असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांनी पत्नी व दोन मुलांना बेड्या ठोकल्या आहेत.

अवधूत लक्ष्मण मुधोळ रा. बेलमंडळ असं मयत शेतकऱ्यांच नाव आहे. मुधोळ हे आपली पत्नी व दोन मुलासह बेलमंडळ येथे राहत होते. मुधोळ यांच्या कुटुंबात मागील काही दिवसांपासून शेतीच्या वादातून खटके उडत असत, अनेकदा कडाक्याचे भांडण देखील झाले होते. शेतकरी मुधोळ यांनी परस्पर शेती विक्री केल्याचा वाद एवढा विकोपाला गेला की यात बुधवारी रात्री पत्नी अन दोन मुलांनी अवधूत मुधोळ यांना बेदम मारहाण केली. यात मुधोळ यांचा खून केला.

शेतकरी मुधोळ यांचा खून झाल्यानंतर आई अन दोन मुलांनी पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत घेऊन थेट शेत गाठले अन मृतदेह पेटवून दिला. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे आजू बाजूचे शेतकरी गोंधळले. त्यामुळे शेजाऱ्यांनी जवळून जाऊन पाहिले तर मृतदेह जळत असल्याचे लक्षात आले. तेव्हा कुठे या खुनाच्या घटनेला वाचा फुटली. घटनेची माहिती कळताच बाळापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पत्नी अन्नपूर्णा मुधोळ, मुलगा लक्ष्मण व ओंकार यांना ताबडतोब अटक केली.

खून करून पुरावा नष्ट केल्यानंतर तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती बळापूर पोलिसांना मिळताच ठाणेदार पंढरीनाथ बोधनपाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली, पाहणी करून आरोपीला अटक केली. मात्र या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.