राष्ट्रवादीने लावले मनसेला सुरुंग ! कुख्यात गुंडाच्या पत्नीने केला राष्ट्रवादमध्ये प्रवेश

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते पक्षांतर करतांना दिसत आहे. मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी देखील काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या अगोदर मनसेच्या धडाडीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे मनसे सोडल्यावर पुढील पक्ष प्रवेशाचा मार्ग हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच जात असल्याचं चित्र दिसत आहे.

जयश्री गजानन मारणे या २०१२ साली मनसेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांना २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता. येत्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्व करण्यास मला संधी देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि रुपाली पाटील हे त्याठिकाणी उपस्थित होते.

पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या गजा ऊर्फ गजानन मारणे यांच्या जयश्री मारणे या पत्नी आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्या विरोधात तब्बल २४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या गुन्हांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण या सारख्या गुन्हांचा समावेश आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून यांच्या हत्या प्रकरणी तो २०१४ पासून तुरुंगात होता. सात वर्षानंतर त्याची सुटका पुण्यातील येरवडा तुरुंगातून करण्यात आली आहे.