… तर नागरिक आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मतपेटीतून व्यक्त करतील; आपचा कोल्हेंना सूचक इशारा

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. ‘आझाद’ला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, सर्वांसारखे कलाकाराही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते.एक कलाकार म्हणून कोणती भूमिका करायची किंवा नाकारायची हे ठरविण्याचा अधिकार अमोल कोल्हे यांना नक्की आहे. असेच स्वातंत्र्य राजकारण्यांनाही असते मात्र त्यांना ते वापरता येतेच असे नाही .आणि वापरलेच तर त्याच्या परिणामांनाही सामोरे जावे लागते. कदाचित कोल्हेंची तशी तयारी असेल. नागरिक आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मतपेटीतून व्यक्त करतील.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.