मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘बाबू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. त्याचे चित्रीकरण आता बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून नुकताच या चित्रपटाचा ॲक्शन सिक्वेन्स चित्रित करण्यात आला. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स असून त्यासाठी अंकितने बरीच मेहनत घेतल्याचे दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. या वेळी अंकितसोबत अभिनेत्री रूचिरा जाधवही उपस्थित होती. ‘बाबू’मध्ये अंकित, रूचिरासोबत नेहा महाजनही दिसणार आहे.
‘बाबू’च्या भूमिकेविषयी अंकित मोहन म्हणतो, ‘’बाबू ही व्यक्तिरेखा अंकितच्या खूप जवळची आहे. आमच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. परंतु यातील ॲक्शन सीन्ससाठी मी मेहनत घेतली आहे. मी मार्शल आर्ट, कलरीपयट्टू शिकलो असल्याने मला त्याचा इथे खूप फायदा झाला. याआधीही मी ॲक्शन सीन्स केले आहेत. मात्र ऐतिहासिक आणि अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये खूप फरक आहे. ऐतिहासिक ॲक्शन सीन्स करताना तुमच्या हातात हत्यार असते तर अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये हातच तुमचे हत्यार असते. परंतु या दोन्ही सीन्समध्ये नियंत्रण आणि काळजी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे दोन्ही अनुभव मी घेतले आहेत. ‘बाबू’मधील ॲक्शन सीन्स मी खूप एन्जॅाय केले.’’
श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे निर्माता बाबू के. भोईर असून दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे आहेत. ॲक्शन सीन्सचा भरपूर तडका असलेला ‘बाबू’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
हे ही पहा: