काँग्रेसने जे देशासाठी कार्य केले, त्याला तोड नाही; यशोमती ठाकूर यांचा दावा

मुंबई – काँग्रेस आणि गांधी घराण्याच्या कितीही विरोधक विरोधात गळा काढत असले तरी, काँग्रेसने जे देशासाठी कार्य केले, त्याला तोड नाही. गेल्या सत्तर वर्षात काय केलं ?, तर काँग्रेसने एक व्यवस्था निर्माण केली, ज्यामुळे आजही देशातील सर्व यंत्रणा व्यवस्थितरित्या काम करताना दिसून येतात. आधार ही सुद्धा तेव्हा केंद्रात असलेल्या युपीए सरकारची खूप मोठी उपलब्धी अर्थात कामगिरी आहे. असं महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या, तेव्हा युपीएच्या अध्यक्षा सन्माननीय सोनिया गांधी, पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सर्वदूर पोहचला. मात्र काहींनी जाणीवपूर्वक त्यालाही तत्कालीन राजकीय विरोध केला आणि आता मात्र श्रेय लाटायला पुढे आहेत. असा टोला ॲड. यशोमती ठाकूर यांनी विरोधकांना लगावला. मुंबईतील राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मात्र चांगल्या कार्यक्रमात आम्हाला राजकारण करायचे नाही, म्हणून आम्ही याबाबत बोलत नाही असे राज्याच्या ठाकूर यांनी स्पष्ट केले.

लॉकडाउन काळात सांभाळता करता येत नाही म्हणून एका मुक्या-निराधार महिलेला तिच्या घरच्या लोकांनी लॉकडाउनचा फायदा घेत दक्षिणेतून आणून अमरावतीत सोडलं. हाताचे ठसे आणि रॅटीनावरून तिचा आधार कार्ड शोधून काढून तिची आम्ही पाठवणी केली, तीही महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी अशी साडीचोळी देऊन, अशी ही आधार विषयीची सत्य घटना सांगत त्यांनी आधार नोंदणी किती महत्त्वाची आहे, हे उपस्थितांना सांगितले.