हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही – चंद्रकांत पाटील 

पुणे –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS )  सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. भागवत यांनी  पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. हरिद्वारमध्ये बोलताना  ते म्हणाले की, संतांच्या ज्योतिषशास्त्रानुसार 20 ते 25 वर्षांत भारत पुन्हा अखंड भारत होईल. आपण सर्वांनी मिळून या कामाचा वेग वाढवला तर 10 ते 15 वर्षात अखंड भारताची निर्मिती होईल.

मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारताची कल्पना मांडताना म्हटलं की, “हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षात पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार?”.असं देखील ते म्हणाले.

मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, हिंदू राष्ट्राचा विचार केला तर जिथे हिंदू संस्कृती होती, आजही मंदिरं आहेत, हिंदू विचाराने जीवनपद्धती आहेत असं खूप लांबपर्यंत जावं लागेल. आता त्या सगळ्यांना भारताच्या राजकीय नेतृत्वाखाली आणण्याची संघाची कल्पना नाही. संघाची भूमिका मोहन भागवतांनीच मांडली पाहिजे, असंही ते म्हणाले.

मोहन भागवत यांच्या कल्पनेत, विचारात, मांडणीत अशा प्रकारे सगळ्या जगाचं एक राष्ट्र आणि नेतृत्व हिंदू असं नाही,असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. हिंदू या शब्दातच धर्मनिरपेक्षता आहे. हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही, हिंदू या शब्दातच सर्व धर्मांना समान भाव मिळणं आहे. पण म्हणजे आपल्या धर्माबद्दलही अभिमान बाळगला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.