मुंबई : गड-किल्ले संवर्धन करीत असताना समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींना सामावून घेणे आवश्यक असून गड किल्ले संवर्धनासाठी काम करीत असणाऱ्या संस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या संस्थांचा समावेश सुद्धा प्रामुख्याने समितीमध्ये करण्यात यावा. आता दिवाळीनंतर अनेक गड-किल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे हे लक्षात घेऊनच गड-किल्ल्यांवरील साफसफाई मोहिमेला प्रारंभ करण्यात यावा. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाच्या कामांचे सनियंत्रण करणाऱ्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेऊन लोकचळवळ उभी करणे आवश्यक आहे. कोविड काळात आपण ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशी मोहीम राबवली होती त्याचपद्धतीने आता ‘माझे गड-किल्ले, संवर्धनाची माझी जबाबदारी’ अशी लोकचळवळ सुरु करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
संवर्धन विकास आराखड्यांमध्ये संवर्धन आणि विकास कार्यक्रमांबरोबर या 6 किल्ल्यांवरील स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम, या किल्ल्यांबाबत छायाचित्रण स्पर्धा, किल्ल्यांसंबंधी संपूर्ण माहिती देणारे ॲप विकसित करणे, माहितीपट तयार करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे.तसेच पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक सुविधा गडांच्या पायथ्याशी निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
या सहा किल्ल्यांवर पदपथ दुरुस्ती, मर्यादित वास्तुसंवर्धन, स्वच्छता मोहीम, जनजागृती अभियान याबरोबरच माहिती पुस्तिका तयार करणे, आणि युनेस्कोच्या दर्जाचा सर्वंकष विकास आराखडा तयार होणे आवश्यक आहे. या दृष्टीने पर्यटन आणि वन विभागाने सांस्कृतिक कार्य विभागाला आराखडा द्यावा जेणेकरुन या सर्व सुविधा येथे निर्माण करता येतील असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o