अगदी बिना भांडवली देखील करता येतात हे पाच व्यवसाय

व्यवसाय करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी उत्तम संधी असणारे व्यवसाय जाणून घ्या ..

प्रत्येक व्यक्तीला स्वताचा असा व्यवसाय करता यावा अशी अपेक्षा असते. बहुदा अनेकांचे ते स्वप्न असते. पण प्रत्येकांचे ते स्वप्न पूर्ण होईल असे नाही. कारण व्यवसाय करणे तितके सोप्पे नाही. व्यवसाय करण्यासाठी मोठी जोखीम उचलावी लागते. त्यासाठी गुंतवणूक देखील मोठी लागते.

गुंतवणुकीसाठी सर्वांकडे काही बचत असेल असे नसते. काहीना कर्ज घेणे देखील शक्य नसते. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न अर्धवट राहते. पण आजच्या लेखात आपण असे काही व्यवसाय पाहणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक लागतच नाही.

गुंतवणूक लागली तरी ती अगदी थोडीशी. पण व्यवसाय कोणताही असो. गुंतवणूक असो किंवा नसो पण एक गोष्ट मात्र लागते ती म्हणजे मेहनत आणि सातत्य. हे ज्यांच्याकडे असतो तो व्यवसायात नक्की यशस्वी होतो. चला तर मग आजच्या लेखात असेच काही व्यवसाय पाहूयात ज्यामध्ये कमी गुंतवणूक लागते.

1) तुमच्या कलेलाच बनवा तुमचा व्यवसाय – प्रत्येकांच्या अंगी एखादी सुप्त कला असते. काही उत्तम रांगोळी काढतात, काही उत्तम मेहंदी काढतात, काही सुंदर चित्र काढतात. सध्या अनेकजण उत्तम केक देखील बनवितात. तुम्ही अशा कलांचे क्लासेस घेऊ शकता किंवा ऑर्डर घेऊन चांगले पैसे कमावू शकता. तुम्हाला या व्यवसायात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे तुम्हाला नवीन ऑर्डर मिळण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करता यायला हवा. कारण त्या माध्यमांतून तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. या बरोबरच गुणवत्ता देखील हवीच. सुरवातीला तुम्ही अगदी माफक दर ठेवून हा व्यवसाय करू शकता. तुमची रोजची कामे सांभाळून तुम्ही हे व्यवसाय करू शकता.

2) स्टॉक ट्रेडिंग – अगदी घर बसल्या फोन, लॅपटॉप यांचा वापर करून तुम्ही शेअर खरेदी विक्री करू शकता. यामध्ये सुरुवातीला अगदी मोजकीच गुंतवणूक करावी. एकदा का तुम्हाला यामधील खाज-खळगे माहीत झाले की तुम्ही देखील उत्तम स्टॉक ट्रेडर बनू शकता. यासाठी तुम्ही या संबंधी एखादा क्लास देखील करू शकता. यू ट्यूबवर देखील अनेक मार्गदर्शन करणारे विडियो आहेत. ते देखील तुम्ही पाहू शकता. तुमच्या माहिती जर कोणी हे करत असेल तर त्यांच्याकडून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. सुरुवातीला अगदी मोजकीच रक्कम गुंतवा एकदा तुम्हाला मार्केटचा अंदाज आला की तुम्ही यातून अगदी घर बसल्या उत्तम पैसे कमावू शकता. पण हे सर्व करण्यासाठी तुम्हाला बाजाराचा उत्तम अभ्यास करावा लागतो.तसेच वेळ देखील द्यावा लागतो.

3)विमा एजंट – हा सुद्धा कमी गुंतवणुकीत करता येऊ शकणारा व्यवसाय आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीचा विमा काढता येऊ शकतो. मुख्यत्वे लोक दोन गोष्टीचा विमा काढतात एक स्वताचा आणि दूसरा म्हणजे वाहनाचा. पण या व्यवसायात गुंतवणूक जरी नसली तरी तुम्हाला ग्राहक मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सतत पाठपुरवठा करावा लागतो. ग्राहकाला तो प्लान किंवा विमा घेण्यासाठी तयार करणे अवघड असते. यामध्ये वेळेची मोठी गुंतवणूक आहे. लोकांना पटवून देतात येणे गरजेचे आहे. जर तुमचा दांडगा जनसंपर्क असेल तर नक्कीच तुम्ही अनेक ग्राहक जोडू शकता.

4) ब्लॉगिंग – तुम्हाला वाचण्याची आवड असेल आणि तुम्ही उत्तम लिहीत असाल तर नक्कीच ब्लॉगिंग तुमच्यासाठी चांगला व्यवसाय ठरू शकतो. ब्लॉगिंग विषयी लोकांचे अनेक गैरसमज आहेत. ब्लॉगिंग करून तुम्ही अगदी फुकटात पैसे कमावू शकता. हा चुकीचा समज आहे.ब्लॉगिंगसाठी तुमचे उत्तम वाचन हवे. जाणून घेण्याची तयारी आणि प्रचंड मेहनत, सातत्य असेल तरच तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. या बरोबरच सर्च इंजिन ऑप्टिमिझेशन, सोशल मीडिया यांची उत्तम माहिती असणे गरजेचे आहे. तसेच थोडी फार आर्थिक गुंतवणूक देखील करावी लागते. जेव्हा लाखों लोक तुमचा ब्लॉग वाचतील तेव्हाच तुम्हाला त्यातून आर्थिक फायदा होऊ शकतो.त्यामुळे ब्लॉगिंगसाठी सातत्य आणि चिकाटी असावी. आर्थिक फायदा होण्यासाठी तुम्हाला काही काळ वाट देखील पाहावी लागू शकते.

5) ऑनलाइन सामान विकणे – आजकाल मिशो यासारखे अनेक अॅप आले आहेत, ज्यावर तुम्ही सामान खरेदी न करता देखील एखाद्या व्यक्तीस विकू शकता. तसेच फोटो आणि विडियो शेअर करून देखील तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकू शकता. अनेकदा गुंतवणूक न करता तुम्ही रिसेलिंग करून तुम्ही घरबसल्या व्यवसाय करू शकता.या करता देखील सातत्य आणि चिकाटी असावी. ग्राहकाला वस्तु घेण्याबाबत पटवता येणे गरजेचे आहे.