हा देश ‘हम दो हमारे दो’ असे चारजण मिळून चालवतात, पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल

पुणे : केंद्रातील भाजपा सरकारने देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमा कंपन्या, बँका, बीएसएनएल सर्वकाही विकायला काढले आहे. शेतकरी, कामगार यांना संपवायला निघाले आहेत. हा देश ‘हम दो’ हमारे दो’ असे चारजण मिळून चालवतात हे जनतेला आता समजले आहे. केंद्रातील सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने जनजागृती अभियान हाती घेतले आहे. काँग्रेस सामान्य माणसाला केंद्रीभूत माणून विकास केला पण आत्ताचे केंद्रातील सरकार सर्वकाही विकून टाकत आहे. असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, उपाध्यक्ष देविदास भन्साळी, अलकाताई रुपवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर, काँग्रेसच्या काळात असलेला ३५० रुपयांचा गॅस १००० रुपये झाला. पेट्रोल डिझेल १०० च्या वर गेले. राज्यातील आघाडी सरकार सत्तेत येताच पहिला महत्वाचा निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला. भाजपाच्या कर्जमाफीसारखं रांगेत उभे करून, वेगवेगळ्या याद्या करून, अनेकांना त्याचा लाभ मिळू नये म्हणून नियम, अटी लावल्या नाहीत तर सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी कर्जमाफी राबविली. शेतकऱ्यांना संकटात मोठी मदत केली असेही पटोले म्हणाले.