ही तर सामान्य माणसाची क्रूर थट्टा; राज्याने केलेल्या इंधन दर कपातीवर फडणवीसांची टीका

मुंबई –  केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या (Petrol – Diesel) दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकराने (Central Gov) पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली आहे.

रविवारी राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात (VAT) 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलवरील करात 1 रुपये 44 पैसे कपात कऱण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यावर अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून दर कमी कऱण्याची मागणी विरोधी पक्षांसह नागरिकांकडूनही होत होती.केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यात फडणवीसांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. हा निर्णय म्हणजे सामान्य माणसाची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करत त्यांनी किमान 10 टक्के भार घेण्याची मागणी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान 10 टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!” “अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते,”असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.