मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार हीच पक्षाची भूमिका – अजित पवार

मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी रहायचं आणि सरकार टिकवायचं ही काल आणि पुढेपण पक्षाची भूमिका राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आज केला.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी ६.३० वाजता मातोश्रीवर जाऊन पवारसाहेब, खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे आम्ही भेट घेणार असून जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे याबाबत चर्चा करणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

विधीमंडळाचे जे काही कामकाज आहे त्याबद्दलचा निर्णय विधानमंडळाचे अध्यक्ष घेतील कारण त्यामध्ये सरकार म्हणून बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

गुवाहटीला जे आमदार गेले आहेत ते शिवसेनेचे आहोत असे सांगत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून बहुमत आहेच शिवाय ते शिवसेनेचे आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत असेही अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.