दहशतवाद्यांना न घाबरता सामाजिक कार्य करणाऱ्या पंकजा वल्ली यांना यंदाचा ‘बाया कर्वे पुरस्कार’

pankaja valli

पुणे : महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार यंदा जम्मूतील अदिती प्रतिष्ठानच्या किलांबी पंकजा वल्ली यांना जाहीर झाला आहे. मूळच्या तमिळनाडूतील असलेल्या पंकजादीदी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी गेली 25 वर्षे काम करत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव  यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एक लाख एक हजार रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या अध्यक्षा प्रसिद्ध उद्योजिका स्मिता घैसास, विभावरी बिडवे आणि डॉ. संजय तांबट यांच्या समितीने पंकजादीदींची यंदा निवड केल्याचे देव यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव,उपकार्याध्यक्षा विद्याताई कुलकर्णी,सचिव डॉ. पी.व्ही.एस.शास्त्री, बाया कर्वे पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. संजय तांबट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व जम्मू-काश्मीर प्रांताचे माजी प्रचारक इंद्रेशकुमार यांच्या हस्ते सोमवार 29 नोव्हेंबर रोजी पंकजादीदींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कर्वेनगर येथील संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महिला महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होईल.

पुरस्काराची पार्श्वभूमी

भारतरत्न महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेने १९९६ या शताब्दी वर्षापासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘बाया कर्वे पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत कै. गंगूताई पटवर्धन, कै. निर्मलाताई पुरंदरे, कै. विजयाताई लवाटे डॉ. मंदा आमटे, नसिमा हुरजुक, पुष्पा नडे, पेमा पुरव, लीला पाटील, सुनंदा पटवर्धन, रेणू दांडेकर, स्मिता कोल्हे, मीना इनामदार, सिंधुताई अंबिके, डॉ. माया तुळपुळे, पद्मजा गोडबोले, मीरा बडवे, अनुराधा भोसले डॉ. संजीवनी केळकर, जयश्री काळे, सुवर्णा गोखले, सुनीता गोडबोले,  चंद्रिका चौहान, रूषाताई वळवी आदी महाराष्ट्रातील महिलांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सन 2020 पासून हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर देण्याचे संस्थेने ठरवले. त्यानुसार अरुणाचल प्रदेशातील तरुणाईला मादक पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जया तासुंग मोयोंग यांना हा पुरस्कार देण्यात आला. यंदाच्या पुरस्कारासाठी किदांबी पंकजा वल्ली यांची निवड करण्यात आली आहे.

अल्प परिचय

पंकजा यांचा जन्म १९५७ मध्ये तमिळनाडूत झाला. वडलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचे शिक्षण तामिळनाडू व आंध्र प्रदेशात झाले. समाजशास्त्र विषयात पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ विद्याभारतीच्या शाळांमध्ये अध्यापन केले. १९८६ पासून राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारिका म्हणून त्या काम करू लागल्या. घोष विभागासह समितीच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.

जम्मू-काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. अशा अस्वस्थ व अशांत वातावरणात पंकजादीदी १९९६ मध्ये पहिल्यांदा जम्मूला आल्या आणि तेव्हापासून जम्मू-काश्मीर हेच त्यांचे घर झाले. दहशतवादी हल्ले व बाँबस्फोटांमधील जखमींवर जम्मूतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार होतात. पंकजादीदी या रुग्णांना भेटून त्यांची आत्मीयतेने विचारपूस करू लागल्या. अशाच एका भेटीत एक लहान मुलगी पंकजादीदींना चिकटून बसली. तिचे आईवडील दोघेही गंभीर जखमी होते व ही लहानगी प्रचंड घाबरली होती. तिच्यावर मायेची पाखर घालण्याची गरज होती. या घटनेतून दहशतवादी कारवायांमध्ये जखमी व अनाथ होणाऱ्या मुलामुलींना मायेने संगोपन करण्याची गरज पंकजादीदींच्या लक्षात आली. सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि तोफाच्या मारात मृत्युमुखी पडणाऱ्या सामान्य नागरिकांच्या अनाथ मुलामुलींचाही प्रश्र्न पुढे आला. या मुलांच्या वसतिगृहासाठी दिवाण बद्रिनाथ यांचे जम्मूतील घर राष्ट्र सेविका समितीकडे सुपूर्त करण्यात आले. तिथे पंकजादीदींनी अदिती प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ मुलामुलींसाठी वसतिगृह सुरू केले.

पाकिस्तानच्या सीमेवरील दोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात घरातील आई आणि तीन भावंडे गोळीबारात जागीच मृत्युमुखी पडली. पण त्याच वेळी कोणीतरी कपड्यांच्या गाठोड्याखाली लपवल्याने पप्पल, बब्बल आणि काकी अशा अनुक्रमे सात, पाच आणि तीन वर्षे वयाच्या मुली या हल्ल्यातून वाचल्या. लहानग्या काकीच्या खांद्यातून आरपार गोळी गेली होती. या तीन मुली रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात जीव मुठीत घेऊन बसल्या होत्या. ही गोष्ट पंकजादीदींना समजल्यानंतर त्या रोज रुग्णालयात जाऊन या मुलींना भेटू लागल्या. काकी (म्हणजे धाकटी मुलगी – खरे नाव क्षिप्रा) तर इतकी घाबरली होती की, ती अंथरुणावर पाठ टेकवून झोपायचीच नाही. मध्येच किंचाळून उठायची. पंकजादीदी तिची आई झाल्या. काकी त्यांच्या ऊबदार कुशीत शांत झोपायला लागली. या तीन मुलींना घेऊनच अदिती वसतिगृहाचे काम सुरू झाले.

अदिती वसतिगृहात जम्मूबरोबरच लेह-लडाख भागातील अनाथ मुलींनाही आश्रय दिला जातो. न्यायालयामार्फतही काही अनाथ मुली वसतिगृहात संगोपनासाठी पाठवल्या जातात. या सर्वांचा पंकजादीदी अतिशय प्रेमाने सांभाळ करतात. वसतिगृहात राहून मोठ्या झालेल्या मुलींचे योग्य वर शोधून विवाह लावून देण्याचे कामही त्या करत आहेत.

पंकजादीदींवर हल्ल्याचे व त्यांना मारण्याचेही प्रयत्न झाले. दहशतवाद्यांकडून त्यांना धमक्याही मिळाल्या. परंतु, न घाबरता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. सतत पोलिस सोबत असतील, तर घाबरलेली मुलेमुली आपल्या जवळ कशी येतील, म्हणून पोलिसांचे संरक्षणही त्यांनी नाकारले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पंकजादीदींना त्रास देण्याचे व त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, त्यांनी आपले काम निर्धाराने सुरूच ठेवले. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन जम्मू-काश्मीरमध्ये मानवतेच्या भावनेने आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रदीर्घ काळ झटणाऱ्या पंकजादीदींची बाया कर्वे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

Previous Post
Mahavikas Aghadi

‘राज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं’

Next Post
Ramdas Aathwale

‘संविधान दिन कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान’

Related Posts
Mumbai News | दुकाने, आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक न लावणाऱ्यांना १ मे पासून भरावा लागणार दुप्पट मालमत्ता कर

Mumbai News | दुकाने, आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक न लावणाऱ्यांना १ मे पासून भरावा लागणार दुप्पट मालमत्ता कर

Mumbai News | माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक…
Read More
Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो... आजही आहोत आणि भविष्यातही राहू

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू

Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो,…
Read More
uddhav thackeray

ठाकरे सरकारच्या विरोधात व्यापारी एकवटले, पुण्यात सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्यास विरोध

पुणे : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More