‘राज्यात आता हिंदुत्वावादी सरकार; पालघरमध्ये साधूंची हत्या करणाऱ्यांना शिक्षा होणारच’

Pune – पालघर साधू हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यास महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.

पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावानं दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून (CID) तपास सुरु होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्यानं भाजपकडून करण्यात येत होती. राज्यात सत्ता बदलानंतर आता नव्या सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता भाजपा नेते गिरीश खत्री (BJP leader Girish Khatri) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पालघर साधू हत्ये प्रकरणी आता CBI द्वारे तपास होणार असल्याचे नुकतेच समजले. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे स्वागत मी स्वागत करतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर येथे साधूंची हत्या झाल्यानंतर तत्कालीन सरकार व पोलिसांनी प्रकरण दाबले असल्याचे वारंवार आरोप झाले आहेत. आता राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आले असून त्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या साधूंना नक्की न्याय मिळेल हा विश्वास व्यक्त करतो. दोषींना त्यांच्या पापांची योग्य ती शिक्षा न्यायदेवता देईल. असं खत्री यांनी म्हटले आहे.