‘ज्यांनी शेकडो गरिबांना बेघर केले ते आज घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केलेला फ्लॅट जप्त केला म्हणून रडत आहेत’

पुणे – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED)कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्या अटकेची मागणी करत आहेत.

दरम्यान, या घडामोडीवर भाजयुमोचे प्रदीप गावडे (Pradip Gavade)यांनी भाष्य केले असून राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ज्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची मालमत्ता ED ने जप्त केली आहे त्या घोटाळ्यात शेकडो गरिबांना बेघर करण्यात आले आहे तसेच म्हाडाची फसवणूक करण्यात आली आहे. ज्यांनी शेकडो गरिबांना बेघर केले ते आज घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केलेला फ्लॅट जप्त केला म्हणून रडत आहेत.असं गावडे यांनी म्हटले आहे.