सरदार पटेल यांनी एकसंघ केलेला आणि इंदिरा गांधींनी संरक्षित केलेला भारत वाचवण्याची वेळ आली आहे – काँग्रेस

पणजी – स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील विवीध राज्यांच्या एकीकरणाची सर्वात गुंतागुंतीची समस्या सोडवली. आपल्या चातुर्याने आणि आपल्या मुत्सद्देगिरीच्या बळावर त्यांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत खासगी संस्थानांची संख्या ५६२ वरून २६ प्रदेशांवर आणली आणि भारतातील २७ टक्के लोकसंख्येचा भाग असलेल्या सुमारे ८० दशलक्ष लोकांना लोकशाही प्रशासनात सामावून घेतले असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

आयर्न लेडी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांनी उल्लेखनीय संयम आणि कणखरपणा दाखवून १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध निर्णायकपणे जिंकले. पाकिस्तानचे दोन तुकडे करून, बांगलादेश या नवीन देशाची स्थापना केली. देश सुरक्षित व बळकट करण्यास त्यांचे मोठे योगदान आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांचे राष्ट्र उभारणीत मोठे योगदान आहे. त्यांच्या आदर्शांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांचे विचार अंगिकारल्यासच लोकशाहीचे रक्षण करण्यास मदत होईल असे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी सांगितले.

सरदार पटेल यांनी एकसंघ केलेल्या आणि इंदिरा गांधींनी संरक्षित केलेल्या भारताला वाचवण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्यांनी केले.

काँग्रेस पक्षाने आज सरदार पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी पणजी येथील काँग्रेस भवनात साजरी केली. काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रांसिस सार्दिन, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

गुजरातमधील मोरबी येथे केबल ब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या स्मरणार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मौन पाळले आणि अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर, माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांचीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहणारी भाषणे झाली. काँग्रेसचे पदाधिकारी तुलिओ डिसोजा, गुरुदास नाटेकर, सावियो डिसोजा, साईश आरोसकर, अॅड. अर्चित नाईक, जॉन नाझरेथ आदी यावेळी उपस्थित होते.