देश, लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याची गरज आहे – पटोले

मुंबई – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेल्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचे काम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने सुरु आहे. देशाचे संविधान धोक्यात असून संविधान वाचवण्याच्या लढ्यात काँग्रेसला मोठी भूमिका बजावायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल सदस्य नोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले.

काँग्रेसचे मुख्यालय, टिळक भवन येथे आज डिजिटल सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री, प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू व प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, कमांडर कलावत, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री रमेश बागवे, संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राजन भोसले, मुनाफ हकीम, रामचंद्र दळवी, भावना जैन, आ. संग्राम थोपटे, आ. विकास ठाकरे, आ. वजाहत मिर्झा, आ. अमित झनक यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, डिजिटल सदस्य नोंदणी अभियान पक्षांअतर्गत निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. देशभरातील या अभियानात महाराष्ट्र मागे राहणार नाही. तीन कृषी कायद्याच्या आंदोलनात महाराष्ट्रातून देशात सर्वात जास्त ६५ लाख शेतकऱ्यांच्या सह्या नोंदवून देशात आघाडी घेतली होती. डिजिटल सदस्य नोंदणी अभियानातही महाराष्ट्र किमान एक कोटी सदस्य नोंदणी करून देशात अव्वल राज्य ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि सध्या राज्यात सुरु असलेले काम पाहता हे लक्ष्य गाठणे सहज शक्य आहे असेही म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच महत्वाची राहिलेली आहे. सध्या देशाचा कारभार कशा पद्धतीने सुरु आहे ते आपण सर्वजण पहातच आहोत. देश सध्या मोठ्या संकटातून जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देश उभा करण्यात मोलाची कामगिरी काँग्रेसने बजावली आहे. आताही देश, लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याची गरज आहे. डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सर्व नेते, पदाधिकारी यांच्या सक्रीय सहभागाने दिलेले लक्ष्य आपण वेळेत पूर्ण करु. घराघरात जावून काँग्रेस पक्षाची व्याप्ती वाढवण्याची संधी असून आपण सर्वजण यात यशस्वी होऊ, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहचण्याची गरज असून त्यांना एकत्र आणण्यासाठी हे अभियान महत्वाची भूमिका पार पाडू शकते. या अभियानाचा दररोज पाठपुरावा केल्यास दिलेल्या वेळेत आपण लक्ष्य गाठू शकतो. डिजिटल सदस्य नोंदणीच्या माध्यमातून काँग्रेस विचार घराघरात पोहचवण्याची संधी असून राज्यातून जास्तीत जास्त सदस्य नोंदवून काँग्रेसला राज्यात पुन्हा उभारी देऊ.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला १३७ वर्षांचा इतिहास असून पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी केली जात आहे. देशाला भाजपाच्या तावडीतून वाचवायचे असेल तर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणे गरजेचे आहे. सदस्य नोंदणी अभियानातून पक्ष संघटन आणखी मजबूत करून हे अभियान यशस्वी करायचे आहे.

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेऊन एक वर्ष झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसने एक वर्षात केलेल्या कामांची माहिती प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली तसेच एक वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी चित्रफितही यावेळी दाखवण्यात आली.