‘टॉप – ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते… हे का करण्यात येतेय याचं उत्तर केंद्रसरकारने द्यावे’

मुंबई  – प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून एनसीबीचे झोनल युनिट महाराष्ट्रात खोट्या केसेस करुन खंडणी उकळण्याचा धंदा करत असल्याचे सिध्द झाले असतानाच टॉप – ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते हे का करण्यात येतेय याचं उत्तर केंद्रसरकारने द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार राज्यसरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील टॉप – ५ केसेस एनसीबीकडे देण्यात याव्यात असे पत्र महाराष्ट्राच्या डीजींना एनसीबीच्या डीजीने दिले असल्याचे समोर आल्यावर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर हल्लाबोल केला आहे. टॉप – ५ केसेसचा निकष दोन ग्रॅम… चार ग्रॅम… तीन टन की जास्त प्रसिद्धी मिळालेल्या केसेस असणार आहे? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यसरकार आपल्या युनिटच्या माध्यमातून कारवाई करतेय. जेवढं काम एनसीबीला करता येत नाही त्याच्या कितीतरी पटीने राज्यसरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने काम केले आहे. तुमचं युनिट आहे तर काम करा. काम करत नसेल तर एनसीबीचे युनिट बंद करा असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यसरकारचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न केसेस ट्रान्स्फर करुन केला जातोय की एनसीबीमध्ये खंडणी उकळण्याचा धंदा सुरू होता आणि आता टॉप – ५ केसेसच्या माध्यमातून आणखी खंडणी उकळण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा… तुमची संस्था खरंच काम करतेय तर त्या २६ बोगस तयार करण्यात आलेल्या केसेसची चौकशी कधी होणार? निरपराध लोकांना फसवून अटक केली त्यांना कधी सोडणार याचे उत्तर द्या अशी प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.