नाताळची सुट्टी आणि नववर्षाचं स्वागत असा दुहेरी योग साधण्यासाठी राज्यातील पर्यटकांची कोकणाला पसंती

मुंबई – नाताळची सुट्टी आणि नववर्षाचं स्वागत असा दुहेरी योग साधण्यासाठी राज्यातील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन तीन दिवस पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहेत. मात्र राज्यात शिरकाव केलेल्या ओमीक्रॉन विषाणूच्या धोक्यामुळे कोरोनाचे नियम पाळून पर्यटन व्यावसायिक पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कोरोना साथीच्या संकटामुळे गेले दीड वर्ष ठप्प झालेला आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, राज्यात काल ओमिक्रॉनचे 2 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 110 झाली आहे. हे दोन्ही रुग्ण 50 आणि 33 वर्षांचे पुरुष असून, यातील एकाने दुबईचा प्रवास केला आहे तर दुसरा एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा निकट सहवासित आहे. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले असून यातील एक लक्षणविरहित आहे तर दुसऱ्याची लक्षणे सौम्य आहेत.

राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु असून, विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 729 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 162 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, 57 रुग्णांचा त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.