प्रस्तावित नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानांतरण करून चंद्रपूर जिल्ह्यात उभारा – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर –  केंद्र शासनातर्फे प्रस्तावित असलेला नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे पुर्णत्वास येण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे सदर प्रकल्प चंद्रपूर येथे स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgevar) यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेउन केली आहे.

विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून महारत्न कंपन्यांचे अनेक मोठे प्रकल्प. तसेच राज्यातील सर्वात मोठे वीज प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारचा राज्यात तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. त्यादृष्टीकोनातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग च्या सीमेवरील नानार गावात तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु स्थानिक जनतेचा विरोध असल्याने सदर प्रकल्प पूर्णत्वास येण्यास दिरंगाई होत आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्पात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचं योगदान आणि रोजगार देण्याची क्षमता असल्याने हा प्रकल्प राज्यात होणे आवश्यक आहे. त्याकरिता चंद्रपूर जिल्हात या उद्योगवाढीस पोषक वातावरण आहे.  या प्रकल्पाच्या निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा चंद्रपूरात उपलब्ध आहे.

या प्रकल्पाच्या निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा व उपलब्ध असलेली साधन सामुग्री हि चंद्रपूर जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची आवश्यकता असते जी लगतच्याच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून पूर्ण केली जाऊ शकते तसेच या जिल्ह्यात आजपर्यंत नैसर्गिक आपत्ती आलेली नसून कुठल्याही मोठ्या प्रकल्पात अपघात झाले नाहीत. चंद्रपूर जिल्हा हा देशाच्या मध्यभागी असून देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारे सर्व रस्ते आणि लोहमार्ग या जिल्हाला जोडलेली आहेत. सदर प्रकल्प चंद्रपूर येथे स्थापित झाल्यास चंद्रपूर व गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त व मागासलेल्या जिल्ह्यांकरिता वरदान ठरेल. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन येथील युवकांना रोजगार मिळेल. तसेच या प्रकल्पासाठी चंद्रपूरात विदर्भातील इतर भागाच्या तुलनेत मुबलक प्रमाणात वीज, पाणी, मनुष्यबळ, कनेक्टीव्हिटी, उद्योगधंदे या सोई सुविधा उपलब्ध असून उद्योगास अनुकूल वातावरण आहे. या सर्व पाश्र्वभुमीवर सदर प्रस्तावित नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानांतरण करून चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्याबाबत यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना केली आहे.