अनेक उपाय केले पण वजन कमी होत नाही का ? आधी या सवयी लावून घ्या , नक्की दिसतील परिणाम …!

मलायका सारखी फिगर असावी , करीना सारखी टवटवीत त्वचा असावी … ! आपल्या आवडत्या हिरोईनींन सारख आपण दिसावं असं कोणाला नसतं वाटत ? यामध्ये मुलीच नाही तर मुलं देखील आहेत . फिगर चांगली दिसावी हे आजकालच्या जीवनशैलीचा एक भाग देखील झाला आहे . त्यामुळे आजकाल अनेक मुलं-मुली जिम मध्ये घाम गाळताना दिसून येतात . प्रचंड प्रयत्न करून फास्टफूड तेलकट-तुपकट असे पदार्थ टाळतात आणि सलाडवर पोट भरतात . तरीही बऱ्याच जणांना परिणाम काही मिळत नाहीत . त्यात बाळंतपण झालेल्या महिलांचे तर विचारायलाच नको . पोट सुटले , डबल चीन आली आणि अगदी कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही-आम्ही आपल्या फिगर वरून रडगाणं गात असतो . काहीही खाल्लं तरी आम्ही जाड होतो किंवा भरपूर व्यायाम किंवा चाललं करून सुद्धा आम्ही जाड होतो , रोजचं जेवण टाळून फक्त सॅलेडवर जगतोय तरीही आम्ही जाड होतो असं जर का तुमचं होत असेल , तर आता या काही सवयी स्वतःमध्ये लावून घ्या …

तुम्ही जर योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन स्वतःला मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते देखील रूटीनमध्ये या सवयी ऍड करायला नक्कीच सांगतील . तर मग बारीक बारीक होण्यासाठी सर्वप्रथम तुमची झोपेची वेळ तपासा . कारण तुम्ही जर खूप उशिरा झोपत असाल आणि उशिरा उठत असाल तर तुमचे वजन नक्कीच वाढेल. आयुर्वेदानुसार सूर्यास्तानंतर चयापचय मंदावते . त्यामुळे शरीराला योग्य वेळेत आराम मिळणे आवश्यक आहे. रोज रात्री

दहा किंवा त्या आधीच झोपण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी सहा पूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा . तर मग आज रात्री पासूनच हा प्रयत्न करा .
त्यानंतर सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे तुमच्या जेवणाची वेळ . आता तुम्ही जर रात्री दहाला झोपायचे आहे तर रात्रीचे जेवण हे आठ ते साडेआठ या दरम्यान होणे आवश्‍यक आहे . जेणेकरून तुमची चयापचयाची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत पूर्ण झालेली असेल . त्यामुळे तुम्ही शांत झोप घेऊ शकाल . रात्री जर तुम्ही आठ साडे-आठला जेवत आहात , तर सकाळी तुम्हाला आवश्य भूक लागेल . त्यामुळे सकाळी भरपेट नाष्टा कराच.

जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चहा घेण्याची सवय असेल तर पहिला चहा घेताना त्याबरोबर बिस्कीट , खारी अगदी पोळी देखील खाल्लीत तरीही चालेल पण रिकाम्यापोटी फक्त चहा घेऊ नका . त्यानंतर दुपारचे जेवण 12 ते 1 च्या दरम्यान करा . पुन्हा चार ते पाचच्या दरम्यान नाष्टा करा आणि त्यानंतर थेट आठ साडेआठला पुन्हा जेवण … शक्यतो जेवणाच्या वेळा ठराविक ठेवाव्यात . या दोन्ही सवयी लावताना नोकरी करणाऱ्यांना बरेच जड जाऊ शकते . त्यात नाईट शिफ्ट असेल तर नक्कीच तुम्हाला हे नियम फॉलो करणं अवघड आहेत. परंतु कमीत कमी जेवणाच्या वेळा पाळाव्यात ही महत्त्वाचे आहे.

वजन कमी करताना जेवण कमी केले तर कमी वजन होईल हा सर्वात मोठा गैरसमज आहे . फक्त जेवणाच्या वेळा आणि कोणत्या वेळी कोणते अन्न ग्रहण करावे याविषयी आपण पुढच्या लेखात पाहू या … सुडौल बांध्यासाठी रोज व्यायाम आवश्यक करायला हवा . यामध्ये योगासन , चालणे जॉगिंग , सायकलिंग , पोहणे या व्यायामाचा अवश्य अवलंब करा . पोहणे , सायकलिंग , जॉगिंग यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल . तसेच सकाळी व्यायाम केला म्हणून दिवसभर अगदीच निवांत राहू नका. पोटात अन्न गेल्यानंतर थोडेफार चालावे . जर तुमचे बैठे काम असेल तर तासाभरानी थोडेफार चालणे दिवसभर सक्रिय राहणे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे .

तुमच्या आरोग्यासाठी फळं खाणं खूप महत्त्वाचे आहे . फळ किंवा फळांचा ज्यूस घेतल्याने वजन कमी होण्यास नक्की मदत होईल . फळांमध्ये वेगवेगळे विटामिन्स असतात . फळांमुळे शरीराच्या गरजा भरून निघतात .

खाण्यापिण्याच्या सवयी बद्दल झाले , पण दिवसभरात तुम्ही किती पाणी पिता हे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर थंड पाणी पिणे लगेच थांबवा . गरम पाणी प्यायलाने पाचक अग्नी प्रज्वलित करण्यास मदत होते . तसेच चयापचय सुधारण्यासाठी देखील मदत होते . त्यामुळे पोटाचे त्रास कमी होतात आणि कांती सुधारण्यासही मदत मिळेल . लक्षात ठेवा गरम पाणी म्हणजे तुम्हाला कडकडीत पाणी पिण्याची आवश्यकता नाही . जसे जमेल तसे कोमट पाणी प्यावे . तसेच साखर टाळण्याचा सल्ला देखील तुम्हाला आज पर्यंत अनेकांनी दिला असेल , तर तो सल्ला योग्य आहे . साखरेऐवजी गुळाचा वापर करावा . आता या अशा काही सवयी आहेत ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते . तर मग आजपासूनच तुमच्या 21 दिवसांचा चार्ट तयार करा . कोणतीही सवय लावून घ्यायला जर 21 दिवस लागत असतील तर येत्या 21 दिवसात तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात नक्की होईल .