‘दादागिरी करणाऱ्या आणि तोंडात सततची शिवराळ भाषा असणाऱ्यांना कसब्यात राष्ट्रवादी उमेदवार म्हणून देईल, असे वाटत नाही’

Pune- भाजपच्या दिवंगत नेत्या आणि पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. अशातच ‘राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे नुकतेच कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले आहे. त्यामुळे पुण्यातील कसबा मतदारसंघाची जागा रिकामी आहे. अशात या जागेवर पोटनिवडणुक होऊ शकते. याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली पाटील (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, ‘मुक्ता टिळक यांचं आजारांनं निधन झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कसबा पोटनिवडणुक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार आहे. मुक्ताताई २०१९ विधानसभा निवडणुकीत आमदार झाल्यापासून आजारी होत्या. मुक्ता टिळक या आजारी असताना त्यांनी शक्य तेवढं काम केलं’.

‘अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत. कोणाचं दुःखद निधन झाल्यानंतर भावनिक म्हणून विचार होऊ शकतो. भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक लावल्या आहेत, पंढरपूर, मुंबईमध्ये पोटनिवडणुक झाल्या. कसबा मतदारसंघात असंही कामे झाली नाहीत. खासदारही आजारी आहेत. मुक्ताताई यांच्या घरात तसेही कोणी निवडणूक लढवणार नाही. त्यात मुळात २०१९ साली मनसेने माझं तिकीट मुक्ता टिळक यांच्यासाठीच कापलं होतं’, असा खुलासा रुपाली पाटील यांनी केला.

रुपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर कसबा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार?, पोटनिवडणुकीत उमेदवार देणार का? याकडे लक्ष लागले असताना भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी रुपाली पाटलांवर शरसंधान केले आहे. आझाद मराठीशी बोलताना त्यांनी आपली नेहमीप्रमाणे रोखठोक भूमिका मांडली.

यावर बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, “रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्युज असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, त्याचे मतात रूपांतर होऊ शकत नाही. मध्यंतरी मनसेने पदवीधर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती, तेव्हा अत्यंत लाजिरवाणी मते त्यांना पडली होती. त्या वेळेलाही सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्हयुज होत्या, परंतु मतांचा दहा हजाराचा टप्पासुद्धा पाच जिल्ह्यातून पार करता आला नव्हता.”

“कसबा मतदारसंघात सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो. लढायची इच्छा कोणीही व्यक्त करू शकतं, त्याबद्दल दुमत नाही. परंतु वारंवार दादागिरी करणारा आणि तोंडात सततची शिवराळ भाषा असणारा कार्यकर्ता/कार्यकर्ती कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार म्हणून देईल, असे वाटत नाही”, असेही तृप्ती देसाईंनी म्हटले.