राम कृष्ण हरी : … म्हणून देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले. याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत विशेष आभार मानले.

आज यावेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला व त्यांना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल, असं म्हणत होकार दिल्याची माहिती विश्वस्थांनी दिली.

या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूनगरीत लवकरच येतील असा विश्वास विश्वस्थांनी व्यक्त केलाय. संपूर्ण दगडात कोरीव काम करून हे मंदिर उभारलेलं आहे. जे आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणासाठी प्रतीक्षेत आहे. या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.