जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा; भुजबळांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

नाशिक :- जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रस्थानी राहिली असून यंदाच्या निवडणुकीत देखील जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करण्यात यावी अशा सूचना जिल्ह्यातील आजी माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना देत आगामी जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगरपालिकांसह नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीपराव बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ,मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार शेख आसिफ शेख,माजी आमदार जयवंतराव जाधव,संजय चव्हाण,दीपिका चव्हाण,जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पवार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच निर्णायक स्थितीत राहिला आहे. त्यामुळे यंदाही नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने पक्षीय स्तरावर सन्मानपूर्वक आघाडी करण्यास आपला प्रयत्न असणार आहे.शहर आणि जिल्हाभरात केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून आपण सर्वांनी कामाला सुरुवात करावी. आपापल्या परिसरात कोविडच्या संदर्भात आवश्यक ती मदत करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना सुध्दा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. सदर बैठकीत नाशिक, मालेगाव महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित सदस्यांनी चर्चेत सहभाग घेऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मते मांडली. यावेळी सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.